आमदार अनिल गोटेंमुळे धुळ्याची निवडणूक गाजली
धुळ्यात भाजपला कडवं आव्हान
प्रशांत परदेशी, धुळे : धुळे महापालिकेची निवडणूक गाजली ती भाजप बंडखोर आमदार अनिल गोटे विरूद्ध भाजपचे मंत्री यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपामुळे. अनिल गोटे यांनी पातळी सोडून टीका केली. त्याला भाजप नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं. धुळे महापालिका निवडणूक पूर्वसंध्येला पक्षावर विशेषतः जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शिवराळ भाषेत आमदार अनिल गोटे यांनी टीका केली. तसंच आपल्या लेटरहेडवर पत्रक काढून त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
भाजपा हा राष्ट्रवादी काँग्रेसची नवी झेरॉक्स प्रत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. भाजपमधले २३ असंतुष्ट आमदार आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. गोटे एकीकडे शिवराळ भाषेचा वापर करत असताना भाजप मंत्री मात्र संयमाने प्रतिक्रिय़ा देत होते. गोटे यांना पराभव दिसत असल्यानेच ते वाटेल ते बोलत असल्याचा टोला भाजपच्या मंत्र्यांनी लगावला.
मतदानाच्या आधी अत्यवस्थ वाटायला लागल्यामुळे गोटे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुपारी अनिल गोटे यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं. मतदान केल्यावर त्यांनी भाजपवर आणि मुख्यमंत्र्यांवर पुन्हा तोफ डागली. आता या आरोप प्रत्यारोपांचा मतदारांवर किती परिणाम झालाय हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे...