प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे शहरातील LIC वीमा एजेंट राजेंद्र बंब (Rajendra Bamb) यांच्या घरावर पोलिसांचा छापा टाकण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे छापा टाकल्यानंतर राजेंद्र बंब यांच्याकडून तब्बल 1 कोटी 42 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आणि 46 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अजून मोठे घबाड हाती लागण्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेंद्र बंब यांच्यावर कोणता गुन्हा? 


राजेंद्र बंब यांच्याकडे जयेश दुसाने नावाचा व्यक्ती कामाला होता. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे जयेशने बंब यांच्याकडून दोन वेळा व्याजाने पैसे घेतले. मात्र राजेंद्र बंब यांना पैशाच्या मोबदल्यात वडिलोपार्जित संपत्तीचे कागदपत्रे जयेशने दिले. व्याजासहीत पैशांची परतफेड केल्यानंतरही बंब यांनी जयेश यांच्या संपत्तीचे कागदपत्रे परत केले नाही. जयेश दुसाने यांची पोलिसात बंब यांच्याविरोधात तक्रार. प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेत जयेश दुसाने यांनी तक्रार दाखल केली. 


जयेश दुसाने यांची पोलिसांकडे धाव - 


संपत्तीचे कागदपत्र परत घेण्यासाठी जयेश दुसाने यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी गुन्हे शाखेला रीतसर सूचना देत गुन्हा दाखल करत कारवाईचे आदेश देण्यात आली. 



गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 मिनिटात कारवाई - 


गुन्हा दाखल होताच 5 मिनिटात बंब यांच्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुरु झालेली झडती रात्री उशिरापर्यंत सुरु होती. रात्रीच बंब यांना पोलिसांनी अटक केली. 


झडतीत इतके सापडले घबाड - 


आर्थिक गुन्हा शाखे सह अन्य पोलिसांच्या मदतीने 5 पथकांकडून झडती. पोलिसांना बंब यांच्याकडे मोठे आर्थिक घबाडचं सापडले आहे. बंब आणि त्यांच्या भावाकडून पोलिसांनी 1 कोटी 42 लाख 19 हजार 550 रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर 46 लेख 22 हजार 378 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यासह कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे कागदपत्रांची पोलिसांना सापडले आहेत. 38 कोरे धनादेश, 104 खरेदी खत, 13 सौदा पावत्या, 33 कोरे मुद्रांक आणि 204 मुदत ठेवीच्या पावत्या सापडल्याचे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 


3 लॉकर तपासणे बाकी - 


पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, बँक लॉकर सील करण्याच्या सूचना बँकेच्या शाखांना देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. जे 3 लॉकर सील करण्यात आले, त्यांची झडती लवकरचं घेण्यात येणार आहे. यात लॉकरमधून काय बाहेर पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 


बनावट फायनान्स कंपनी - 


जी पी फायनान्स कंपनी, कांदिवली, मुंबई ही बनावट फायनान्स कंपनी स्थापन करुन बंब लोकांना व्याजाने पैसे देत होता. 24 ते 36 टक्के व्याजाचे दर लावत पठाणी वसुली बंबकडून सुरू होती अशी प्राथमीक मााहती समोर आली आहे. सुरवातीच्या तपासात ही कंपनी बनावट असल्याचे समोर आले असून, अजून सखोल तपासात याबाबत माहिती समोर येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी व्यक्त केला आहे. अश्या पद्धतीने ६०० जणांची फसवणूक करण्यात आल्याच्या आरोपाची चौकशी देखील पोलीस करीत आहेत. 


राजेंद्र बंब यांचे कारनामे -


समाजामध्ये आपण कसे प्रतिष्ठित आहोत हे दाखवण्यात राजेंद्र बंब पटाईत आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी देखील कोरोना काळात बंब यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचा सत्कार केल्याची माहिती समोर आली होती. तसे फोटो देखील सोशल मीडियावर प्रसारित झाले होते. अनेक अधिकाऱ्यांशी मैत्री असल्याची बतावणी देखील बंब करत असल्याची माहिती समोर येत आहे. शस्त्र परवाना असल्याने लोकं तक्रार करायला घाबरत असल्याचे ही चर्चा आता दबक्या आवाजात सुरु झाली आहे.