धुळे : भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पक्षावर गंभीर आरोप केलेत. केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरेंसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांना धुळे जिल्हाबंदी करा, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांची निवडणूक आयोगाकडे केली आहे. तिघांकडून निव़डणूक प्रक्रियेत ढवळाढवळ होण्याचीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी निवडणूक आयोगाकडे एक मागणी करताना भाजपवर गंभीर हल्लाबोल केलाय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, या तिन्ही मंत्र्यांचे स्वीय सहायक यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी धुळे महापालिका निवडणूक पार पडत नाही तोवर जिल्हाबंदी करण्याची मागणी केली आहे.


हे मंत्री आणि त्यांचे सहकारी हे निवडणूक निर्भय आणि निकोपपद्धतीने पार पडू देणार नाहीत, असा दावा गोटे यांनी केला आहे. गोटे यांनी आपल्या मागणीला, दोन पोलिसांमध्ये झालेल्या एक मोबाईल संभाषणाच्या सीडीचा आधार बनवले आहे. या संभाषणाची चौकशी करुन या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही आमदार गोटे यांनी लेखी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे केली आहे. एका महापालिका  निवडणुकीसाठी सरकार पणाला लावण्याचा हा  प्रकार असल्याचा आरोपही गोटे यांनी पत्रकार  परिषदेत केला.