नंदुरबारमध्ये ढगफुटीचे पाच बळी, घर-गुरेही गेली वाहून
हा पाऊस नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्याला भळभळती जखम देऊन गेला.
प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : गेल्या एका महिन्यपासून दडी मारलेल्या पावसानं धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्री हजेरी लावली. या पावसामुळे सुखं आणि दु:खाचं असं वातावरण परिसरात आहे. काहींसाठी दिलासादायक तर काहींसाठी धक्कादायक घटना या पावसानंतर घडलीयं.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतली लाखो हेक्टर क्षेत्रावरची पिकं वाचली. मात्र हा पाऊस नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्याला भळभळती जखम देऊन गेला. यात पाच जणांचा बळी गेलाय.
स्थानिकांमध्ये दहशत
नवापूर आणि विसापूर भागात झालेल्या भयानक पावसामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वाहतूकही बंद करावी लागली आहे. प्रशासन प्रत्येकाला मदत करण्याच्या तयारीत आहे. पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन लोकप्रतिनिधींनी केलंय.
पिकांना जीवदान
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यात दुसरऱ्यांदा चांगला पाऊस पडला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत पावसाअभावी पिकं मरणासन्न झाली होती. नंदुरबार जिल्ह्यात एकुण चारशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर धुळे तालुक्यात पावसानं दडी दिल्यामुळे कापूस धोक्यात आला होता. मात्र आता धुळ्यातही पिकांना जीवदान मिळणार आहे.