पुण्यात पुन्हा खळबळ! 2 किमीपर्यंत पाठलाग, नंतर डिजीटल कंटेट क्रिएटरला मारहाण; Video viral

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे चर्चेत आहे. आता पुण्यात पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची चर्चा आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, महिलेनेच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. संबंधित महिला एक कंटेट क्रिएटर असून हल्ला झाला त्यावेळी तिच्यासोबत तिची मुलंदेखील होती. क्षुल्लक कारणावरुन महिलेला मारहाण झाली असल्याचा दावा तिने केला आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर हा प्रकार घडला आहे.
काय घडलं नक्की?
बाणेर-पाषाण लिंक रोडवरुन गाडीवरुन महिला तिच्या दोन मुलांसह चालली होती. त्यावेळी हल्ला करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने त्यांना जायला जागा दिली. त्यांनी गाडीदेखील बाजूला केली. मात्र कार चालकाने गाडी थांबवून महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोराने महिलेच्या नाकावर जोरदार ठोसा मारल्या. त्यानंतर त्यांच्या नाका व तोंडातून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. महिलेवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून निघून गेला. मात्र, इतक्या क्षुल्लक गोष्टीवरुन हल्ला का करण्यात आला हे मात्र, अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीये.
हल्ला करणारा व्यक्ती वृद्ध असून तो वेगाने गाडी चालवत होता, असं महिलेने सांगितलं आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच, पुणे हे महिलांसाठी आणि नागरिकांसाठी किती सुरक्षित आहे असा सवाल तिनं उपस्थित केला आहे. तसंच, तिने महिला आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली आहे. या महिलेवर सध्या बाणेरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोराने 2 किमीपासून पाठलाग केल्याचा दावा महिलेने केला आहे.
या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मारहाण करणारा व्यक्ती कोण आहे? त्याने हल्ला का केला हे अद्याप समोर आलेले नाहीये.