महाविकास आघाडीचा सातबारा कुणाचा? कसेल त्याची जमीन, जिंकेल त्याची जागा
महाविकास आघाडीत आता पुणे लोकसभा मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू झालीय. पुणे लोकसभा पोटनिवडणूक होईल असं सांगत अजित पवारांनी पुण्यावर दावा केला आहे. पुणे काँग्रेसकडेच राहील असं प्रत्युत्तर काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी दिलं आहे.
Maharashtra Politics : गिरीश बापटांच्या निधनानं रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. याच जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु झाली आहे. कसेल त्याची जमीन आणि जिंकेल त्याचा सातबारा.. हे सूत्र ठरलं तर कसब्याप्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक सहज जिंकता येईल
काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच
जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाला थोडा त्याग करावाच लागेल अस संजय राऊत म्हणाले. पुणे लोकसभा पोटनिवडणूक कोण लढणार यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु झालीय आणि त्यावरुनच संजय राऊतांनी कान टोचलेत. तर राऊतांच्या या विधानावर भुजबळांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. तर, पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा परंपरागत काँग्रेसची आहे आणि पुण्यात काँग्रेसचं वर्चस्व असल्याची आठवण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी करुन दिली.
जागा कोण लढणार यावरुन भाजपतही रस्सीखेच
तर, पुण्याची जागा कोण लढणार यावरुन भाजपतही रस्सीखेच सुरु झाली आहे. पुण्याच्या जागेसाठी माजी खासदार संजय काकडे, भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांची नावे चर्चेत आहेत. पुण्याचे दिवंगत भाजप खासदार गिरीश बापटांच्या जागी त्यांचा मुलगा गौरव किंवा सून स्वरदा बापट यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. अजून या पोटनिवडणुकीची घोषणा झालेली नाही. मात्र भाजपनं संधी दिल्यास निवडणूक लढवू, असं गौरव आणि स्वरदा बापट यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितल होते.
मेरीटच्या आधारावर पुण्याचा उमेदवार ठरावण्याची मागणी
पुण्याची जागा ही परंपरागत काँग्रेसची जागा मानली जाते. मात्र यापूर्वीच्या पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे 40 नगरसेवक निवडून आले होते, शहरात दोन आमदार राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळेच मेरीटच्या आधारावर पुण्याचा उमेदवार ठरावा अशी मागणी महाविकास आघाडीत होते आहे. महाविकास आघाडीचा हा वाद फक्त पुण्यापुरता मर्यादित नाही. अनेक मतदारसंघात तीनपैकी दोन पक्ष तुल्यबळ आहेत. त्यामुळेच पुण्याप्रमाणे इतर मतदारसंघातही महाविकास आघाडीत अशाप्रकारची रस्सीखेच पाहायला मिळाली तर नवल वाटायला नको.
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाल्यावर आता भाजपमध्येही इच्छुकांची रांग लागलीय. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षादेश आला तर लोकसभा नक्कीच लढवू असं ते म्हणाले. निवडणूक लागल्यास पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं ते म्हणाले.
पुण्यात पोटनिवडणुकीचं लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं माहिती मागविल्यानं त्याच्या चर्चेला उधाण आलंय. गिरीश बापट यांच्या निधनानं पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालीय. परिणामी इथं पोटनिवडणूक लागण्याची शक्यता गृहीत धरून तयारी सुरू करण्यात आली आहे.