सांगली : सांगलीला महापुराचा तडाखा बसला आणि लाखो लोक पुराने बाधित झाले. या पुरात १३ हजार घरं आणि दुकानं पाण्याखाली गेले. महापूर जरी १५ वर्षांनंतर पुन्हा आला असला तरी सांगली शहरातील अनेक घरात जवळपास दरवर्षी पुराचं पाणी जातं. पूर्वीची घरं बाधित होतातच मात्र पूररेषेच्या आतील भागात महापालिकेकडून नवीन बांधकामांना, परवाने दिल्याने नवीन घरं सुद्धा उभारण्यात आली आहेत. मात्र पुराच्या वेळी ती पाण्याखाली जातात. २००५ नंतर बांधलेला सांगली महापालिकेच्या आयुक्तांचा शासकीय बंगला हा सुद्धा पूरपट्यात असून तोही पुराच्या वेळी पाण्यात जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा कारभार म्हणजे एकीकडे आपत्ती व्यवस्थापन, तर दुसरीकडे आपत्तीलाच निमंत्रण असा आहे. सांगलीची मुख्य बाजारपेठही पाण्याखाली जात असल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. सततच्या पुराचा विचार करून आत्ता नवी मुंबईच्या धर्तीवर 'नवी सांगली' तयार करण्याचा पर्याय पुढे येत आहे. दरम्यान पूरपट्यात बांधकाम परवाने देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


पुराचं पाणी ओसरु लागल्यानंतर आता पुरग्रस्तांसाठी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुणे - बंगलोर महामार्ग आज जरी सुरु झाला असला तरी गेले सात दिवस हा मार्ग बंद असल्याने या मार्गावर उभ्या असलेल्या ट्रक ड्रायव्हर, खाजगी बसमधील प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. त्यांच्या मदतीसाठी महामार्गालगत असलेली गावं धावून आली आहेत. या प्रवाशांना गावकरी सर्वतोपरी मदत करत आहेत. महिला प्रवाशांना आपल्या घरी नेऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली.