Disha Salian Case Aditya Thackeray: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ सुत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिशा सालियान प्रकरणामध्ये सध्या सत्तेत असलेलं एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार विशेष तुकडी (एसआयटी) स्थापन करुन चौकशी करणार आहे. या एसआयटी चौकशीमध्ये आदित्य ठाकरेंचीही चौकशी केली जाणार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी काम करणार आहे. 


फडणवीसांनी दिले आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी मागील काही काळापासून सातत्याने काही आमदारांकडून केली जात होती. याच मागणीची दखल घेत मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. आता लवकरच ही चौकशी केली जाईल असं सूत्रांचं म्हणणं आहे.


बऱ्याचदा झाले आरोप


दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप अनेकदा भाजपाच्या आमदारांकडून करण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी आदित्य ठाकरे नेमके कुठे होते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी अनेकदा आदित्य ठाकरेंचा थेट उल्लेख करत दिशा सालियान प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचा दावा केला होता. आता याच प्रकरणात आदित्य ठाकरेंची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होईल अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.


नक्की वाचा >> बलात्काराचा आरोप, ‘AU’चे 44 फोन, आदित्य ठाकरे कनेक्शन अन्..; दिशा सालियन प्रकरण काय?


इमारतीवरुन पडून मृत्यू


दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणीही अपघाती मृत्यूची नोंद केली होती. दिशा हिची हत्या झाली असून आदित्य यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.


सहा दिवसांनी सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या


यानंतर अवघ्या 6 दिवसांनी म्हणजेच 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत हा त्याच्या वांद्रे येथील त्याच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत तक्रार दाखल केली होती. नंतर, हे प्रकरण सीबीआयकडे सोपण्यात आले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडीमार्फत) चौकशी सुरू आहे. रिया अमलीपदार्थाचे सेवन करत होती आणि तिने ते सुशांतलाही ड्रग्जचं व्यसन लावल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केलेला. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने केला.


AU क्रमांकावरुन 44 फोन आल्याचा दावा


सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘AU’ नावाने सेव्ह केलेल्या क्रमांकावरुन 44 फोन कॉल आले होते. ‘AU’ चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे, असा आहे, असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत मुद्दा उपस्थित चौकशीची मागणी केली होती.