सर्फराज मुसा, झी मीडिया, सांगली : पावसाळा (Rainfall) संपत आला तरी राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके जळून गेली आहेत. सांगली (Sangli News) जिल्ह्यामध्येही दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Sangli District Central Bank) सभेत लावणी आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा आहे की तमाशाचा फड? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 96 वी सर्वसाधारण सभा कर्नाळ रोडवरील धनंजय गार्डन येथे पार पडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभेच्या ठिकाणी बॅंकेकडून सभासदांसाठी चक्क मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये आर्केस्ट्राच्या माध्यमातून ठसकेबाज लावणी गाण्याद्वारे सभासदांच्या मनोरंजन करण्यात आले. मग यावेळी लावण्यांच्या गाण्यांवर आणि गीतांवर उपस्थित सभासदांना थिरकण्याचा मोह आवरता आला नाही.


त्यामुळे सभेदरम्यान आता जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा की तमाशाचा फड ? असा प्रश्न निर्माण झाला होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदार संजयकाका पाटील, शिवसेना शिंदें गट आणि काँग्रेस गटाची सत्ता आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी होरपळत असताना बँकेच्या प्रशासनाकडून अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजन करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.


 



दरम्यान, यावेळी सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने परिणामी शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात नद्या कोरड्या पडल्याने नदी काठावरील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव या तालुक्यात देखील पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. तसेच जत, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ सारख्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.