मुंबई : अनेकदा सरकारी रूग्णालयांमध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याने अनेक रूग्णांना उपचाराअभावी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप बघायला मिळतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अशा डॉक्टरांची तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. पण या प्रश्नाचे निरसन झाले आहे. आता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यास आरोग्य सल्ला संपर्क केंद्राच्या १०४ क्रमांकावर नागरिक तक्रार करू शकतील. ही सुविधा १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. केंद्राच्या माध्यमातून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना त्वरीत रुग्णालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी दिली.


आपत्‍कालीन परिस्थितीत पहिला अर्धा तास हा अमूल्य असतो. या कालावधीत रुग्णांवर उपचार झाल्यास त्यांना होणारा त्रास, मृत्यूदर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णांचा सार्वजनिक आरोग्य सेवेवरचा विश्वास अधिकाधिक दृढ होण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या सेवेमुळे रूग्णांना गरजेनुसार वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.