प्रशांत परदेशी, धुळे :  कोरोनाच्या भीतीने  काही लोक आता टोकाची भूमिका घेऊ लागले आहेत. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याची गरज असली तरी काही लोकांकडून आरोग्य सेवकांची अडवणूक करण्याचे निषेधार्ह प्रकार घडत आहेत. धुळे जिल्ह्यातील शहादा शहरात असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे एका डॉक्टरने केलेल्या व्हिडिओ क्लीपमुळे पुढे आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात मोदी सरकारनं कायदा कठोर केला असला तरी लोकांची मानसिकताही बदलण्याची गरज आहे. धुळ्यामध्ये गेली ४३ वर्षे रुग्णसेवा करणाऱ्या कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांला लोकांकडून अडवणुकीचा सामना करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार डॉ. मालविका कुलकर्णी एक व्हिडिओ क्लीप तयार करून समोर आणला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही लोक असे निषेधार्ह प्रकार करत असल्याचं दिसून येत आहे.


काही ठिकाणी रुग्णालयाकडे जाणारे रस्ते अडवून ठेवल्याचे प्रकार घडले आहेत. कुलकर्णी रुग्णालयाच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याचं डॉ. कुलकर्णी सांगतात. रुग्णसेवा करणाऱ्या नर्सला किराणा माल देण्यास नकार दिला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचंही बालरोगतज्ज्ञ डॉ. मालविका कुलकर्णी यांनी सांगितलं.


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बिकट काळात रुग्णसेवा सुरु ठेवण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न आहे. हे आव्हान पेलवताना दुसरीकडे काही लोकांकडून हेटाळणीचे प्रकार होत आहेत. असे प्रकार डॉक्टर आणि आरोग्यसेवकांसाठी धक्कादायक आणि मनोबल खच्ची करणारे आहेत, अशी भावना डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. डॉक्टरांनी याबाबत व्यथा मांडणारी व्हीडिओ क्लीप केल्यानंतर ती व्हायरल झाली आणि हे प्रकरण अंगाशी येईल म्हणून लोकांनी रस्ता मोकळा केला.


पोलीस मात्र असा कुठलाही प्रकार सध्या नसल्याचं सांगत आहेत. असं घडत असेल तर तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी ‘झी २४ तास’ ला सांगितले की, या संदर्भात आम्ही स्वतः हॉस्पिटलला जाऊन आलो. सध्या त्यांना कोणतीही अडचण नाही. परिसरात पेट्रोलिंग लावली आहे. कोरोनाचा एक रुग्ण शहाद्यात मिळाल्यानंतर संपूर्ण प्रशासन सतर्कतेने काम करतंय. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना कोणतीही अडचण असेल आणि त्यांनी तक्रार दिली तर निश्चित कारवाई करू. सध्या कोणताही प्रकार त्याठिकाणी नाही आणि कोणताही रस्ता बंद नाही.


 



पोलीस आणि प्रशासनाचं सहकार्य मिळत असलं तरी हॉस्पिटलमध्ये दैनंदिन काम करताना मानसिक त्रास होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.