योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : कांदे व्यापाऱ्यांनंतर आता रोखीत व्यवहार करणारे आणि त्याच्या नोंदी न ठेवणारे डॉक्टर्स सध्या प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यानंतर कोचिंग क्लास आणि बांधकाम व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. गोपनीय सर्वेक्षणांअंतर्गत पन्नास कोटीच्यावर कर चुकवलेल्यांची संख्या नाशिकमध्ये मोठी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉर्पोरेट हॉस्पिटल्स, मोठमोठे डॉक्टर्स, पॅथोलॉजी लॅब्ज आणि संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणात कर बुडवत असल्याचं लक्षात आलंय. अनेक डॉक्टर्स शासकीय सेवेत असताना खासगी सेवा करून पैसे कमवत असल्याचंही उघड होतंय. अनेक डॉक्टर्स कुठलंही बिल देत नाहीत. त्यामुळे सर्वाधिक बेहिशेबी मालमत्ता डॉक्टरांकडे असल्याचं आढळलं आहे. 


राज्यात केलेल्या एकूण ४५ सर्वेक्षणात १०५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळलं आहे. पुण्यात केलेल्या एका सर्वेक्षणात वीस कोटी रूपयांची डॉक्टरांची बेहिशेबी मालमत्ता समोर आलीय. 


दुर्जनको डर आणि सज्जन को सुरक्षा हे आयकर विभागाचं ब्रीद बनल्याचं आयुक्तांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत सांगितलं. करबुडव्यांबाबत यापुढे कोणतीही तडजोड होणार नाही असंही आयुक्तांनी म्हटलंय. 


निव्वळ कर संकलनात २२ टक्के वाढ झालीय. यावर्षी हे उद्दीष्ट १२५ टक्के ठेवण्यात आलंय. माध्यमांना टाळणारा हा विभाग आता लोकाभिमुख होऊन अधिकाधीक करबुडव्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय हे विशेष..