डॉक्टरच्या पत्नीला कोरोनाची लागण; ठाण्यातील घटना
ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 24वर पोहचला
ठाणे : मुंबईतनंतर आता ठाण्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. आतापर्यंत शहरांत 22 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी त्यात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता डॉक्टरच्या पत्नीचा कोरोना रिपोर्टही पॉझिटीव्ह आल्याचं समोर आलं आहे. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संपूर्ण ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 24वर पोहचला आहे.
दुसरीकडे मुंब्र्यातही आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंब्र्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा तीनवर पोहचला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कळवा हा ठाणे पालिकेतील हॉट स्पॉट आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे संपूर्ण शटडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कळव्यात कोरोना रुग्णांची संख्या 10वर पोहचली आहे. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पालिका प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण कळवा शटडाऊन करण्यात येणार असून केवळ मेडिकल सुरु राहणार आहेत. इतर अत्यावश्यक गोष्टींची फोन वरून डिलिव्हरी मागवण्याचं सांगण्यात आलं आहे. पालिकेने सर्व विभागातील नंबर जाहिर केले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कळवा-मुंब्रा-दिवा येथे वाहनांस प्रतिबंध घालण्यात आला आहे. रविवारपासून पुढील आदेश येईपर्यंत कळवा, मुंब्रा, दिवा भागात खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर सर्व गाड्यांना बंदी आहे. या आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
कल्याण - डोंबिवलीतही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कल्याण - डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या 34 झाली आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आजपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरातील भाजी आणि किराणांची दुकाने संध्याकाळी पाचनंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.