औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत तीनशे आमदारांना मुंबईत घरे देण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेवरून राज्यात अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना घरे देण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवा. शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या अशा मागण्या करत या निर्णयाला विरोध केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या निर्णयाला विरोध केला. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निर्णयाला विरोध करत गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे. मात्र, ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन घरे दिली पाहिजे, असे म्हटलंय.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत असतानाच कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मात्र एक अनोखी शक्कल लढवत या निर्णयाला विरोध केलाय.


हर्षवर्धन जाधव हे पहिल्यांदा मनसेचे आमदार म्हणून कन्नड मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करत याच मतदारसंघातून निवडून आले. भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे ते जावई. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यामागे सासरे रावसाहेब दानवे हेच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.



याच हर्षवर्धन जाधव यांनी आमदार यांना घरे देण्याच्या निर्णयाचा विरोध केलाय. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे आज फाटके कपडे घालून रस्त्यावर उतरले. हातात एक बॉक्स घेऊन या माजी आमदार महोदयांनी आमदारांच्या घरासाठी चक्क भीक मागितली.


अल्लाह के नाम पे दे दे, आमदार के नाम पे दे दे, काँग्रेस के नाम पे दे दे, शिवसेना के नाम पे दे दे, राष्ट्रवादी के नाम पे दे दे, भाजप के नाम पे दे दे असे म्हणत ते रस्त्यावर फिरत होते. 


भीक मागून जे पैसे जमतील ते पैसे जमा करून सरकारला पाठवणार आहे. जेणेकरून आमदारांना घर घ्यायला मदत होईल अशी टीका जाधव यांनी यावेळी केली.