प्रणव पोळेकर, रत्नागिरी : आठ-दहा दिवसांपासून अरबी समुद्रात मतलई वारे वाहायला सुरूवात झालीये. त्यामुळे जेली फिश मोठ्या प्रमाणात किनार्याजवळ येत आहेत. या जेली फिशमुळे बांगडा, सुरमई ही मासोळी खोल समुद्रात जातेय. त्यामुळे गिलेटीनद्वारे मारेमारी करणाऱ्या मच्छिमारांना हे मासे मिळेनासे झालेत. मार्गशीर्ष महिन्यात माशांना मागणी घटली होती. त्यामुळे मच्छिमारांचं नुकसान झालं. आता मागणी वाढू लागली असतानाच कोळ्यांच्या जाळ्याला मासे लागेनासे झाले आहे. यामुळे कोकणातील मच्छिमार पुरता बेजार झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंधनाचे दर वाढल्यानं आणि मासे मिळत नसल्याचं मच्छिमारांचं आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे आगामी काळात बांगडा, सुरमई महागण्याची शक्यता आहे.



सध्या बांगडा 50 ते 80 रुपये किलो तर सुरमई 200 रुपये किलो आहे. येत्या काळात यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.


एकीकडे हे संकट असताना जेली फिश मोठ्या प्रमाणात जाळ्यांमध्ये सापडतेय. त्यामुळे जाळ्यांचं नुकसान होतंय. शिवाय 8-10 डॉल्फिनही एकाच वेळी जाळ्यात सापडतात आणि जाळी फाडून बाहेर पडतात. जाळ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्यानं कोकणातील मच्छिमार तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतोय.