डोंबिवली : डोंबिवलीत काल मेट्रोपॉलिटन कंपनीला लागलेली आग अखेर सकाळी विझली. तब्बल १६ तासांनंतर आग विझवण्यात यश आलंय. रात्रभर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नाने ही आग विझवली. डोंबिवलीत 'गुलाबी रस्त्यांची' पाहणी करण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घालण्याचा इशारा दिला होता. डोंबिवली एमआयडीसी परिसरातले पाच कारखाने अतिधोकादायक आहेत. त्यांनी नियमांचं पालन केलं नाही तर या कंपन्या बंद करु असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्या अतिधोकादायक कंपन्यांपैकीच ही एक ही आग लागलेली मेट्रोपॉलिटिन कंपनी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आग विझली असली तरी बॉयलर आणि कंपनीच्या विविध यंत्रातून धूर येत आहे. त्यामुळे आता अग्निशमन दलाने कुलिंगचं काम हाती घेतलंय. मात्र सल्फ्युरिक ऍसिडमुळे पाणी मारल्यानंतरही भडका उडतोय. त्यामुळे माती टाकण्याचा सल्ला देण्यात आलाय. 



दुपारपर्यंत कुलिंगचं काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलंय. या आगीमुळे एमआयडीसी परिसरात धूर पसरला आहे.


मेट्रोपॉलिटन ही केमिकल कंपनी आहे. केमिकल कंपनी असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागला.


फोम आणि पाण्याच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. आता कुलिंगचं काम केलं जातंय.