दुर्देवी! सहा वर्षांच्या वेदांतच्या मृत्यूला जबाबदार कोण? घटनेनं नागरिक संतप्त
डोंबिवलीत एका महिन्यातील दुसरी घटना, कारवाई होणार का?
आतिष भाईर, झी मीडिया, कल्याण : डोंबिवलीत एक दुर्देवी घटना समोर आली आहे. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. डोंबिवलीतल्या सांगर्ली परिसरात ही घटना घडली. वेदांत जाधव असं या मुलाचं नाव आहे.
डोंबिवली पूर्व भागातील सांगर्ली परिसरात एका बहुमजली इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्याकरीता खड्डा खोदण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे खड्ड्याच्या आजूबाजूला सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. इमारतीच्या शेजारी राहणारा वेदांत खेळताना बॉल पाणी भरलेल्या खड्डयात पडला.
चिमुरड्या वेदांतला खड्ड्याचा अंदाज आला नाही. बॉल काढण्यासाठी वेदांत त्या खड्ड्यात उतरला. पण खड्ड्या खोल असल्याने वेदांतचा बुडून मृत्यू झाला. चिमुरड्या वेदांत्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कंत्राटदाराबद्दल संतापही व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. वेदांतच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.
दरम्यान, काही महिन्यापूर्वीच सागाव परिसरात अशीच घटना घडली होती. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.