मुंबई : आज १ सप्टेंबर २०१९ पासून देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक नियम बदलले आहेत. या नियमांचा आपल्या सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यात अनेक परिणाम होणार आहेत, काही नियम अर्थातच दिलासा देणारे आहेत, तर काही नियमांचा परिणाम अतापर्यंत मिळाणाऱ्या सवलतींवर होणार आहे, सर्वात मोठा बदल हा वाहतुकीच्या नियमांमध्ये होणार आहे, राजस्थान आणि प. बंगाल ही राज्य वगळता संपूर्ण भारतात आज पासून मोटर व्हेईकल संशोधन एक्ट लागू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यामध्ये बदल केले. आजपासून  वाहतूक नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. नियमांचं उल्लंघन केल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आलीय. 


वर्षाला अंदाजे दीड लाख लोकांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. हे रोखण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आणलेल्या नव्या कायद्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडल्यास होणाऱ्या दंडामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. 


- मद्यपान करून गाडी चालवल्यास १० हजारांचा दंड भरावा लागेल. सध्या हा दंड २ हजार रुपये आहे. 


- हेल्मेट न घालता गाडी चालवल्यास १०० ऐवजी १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. 


- रॅश ड्रायव्हिंग केल्यास ५ हजारांची पावती फाडली जाईल. सध्याचा दंड केवळ १००० रुपये आहे. 


- सिटबेल्ट न लावता गाडी चालवल्यास होणारा दंड १०० रुपयांवरून हजार रुपये करण्यात आला आहे.  


- मोबाईलवर बोलताना गाडी चालवल्यास एक हजाराऐवजी ५ हजार दंड भरावा लागेल.


- अत्यावश्यक वाहनाला जाण्यास जागा करून दिली नाही, तर १० हजार दंडाची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे. 


- मालवाहू वाहनांमध्ये ओव्हरलोड केल्यास कमीत कमी २० हजारांचा दंड आणि प्रत्येक अतिरिक्त टनाला १ हजारांचा दंड असेल. 


- अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवल्यास दंड ठोठावण्याची तरतूद प्रथमच करण्यात आली आहे. 


- अल्पवयीन व्यक्तीला गाडी चालवताना पकडल्यास त्याचे पालक किंवा गाडीच्या मालकाला दोषी मानले जाईल. त्याला २५ हजारांचा दंड आणि ३ वर्षं शिक्षेची तरतूद नव्या कायद्यात आहे.