नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये दुहेरी हत्याकांडाचे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. नागपुरच्या वाडी सुरक्षा नगरमध्ये रविवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे. नारळ पाणी विकणारे शंकर चक्रवर्ती आणि त्यांची पत्नी सीमा यांचे मृतदेह त्यांच्याच घरी दिसले. सीमा आणि शंकर यांच्या डोक्यावर कोणत्या तरी अवजड वस्तूने वार करुन हत्या करण्यात आली आहे. पण या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस याप्रकरणाची चौकशी करत असून घटनेमागचे सत्य शोधत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शंकर आणि सीमा हे दाम्पत्य आपली 25 वर्षांची मुलगी प्रियांकासोबत नागपूर येथील वाडी सुरक्षा नगर येथे राहत होते. शंकर इथे नारळ पाणी विकून आपल्या परिवाराचा गुजराणा करत होते. प्रियंका एका खासगी कंपनीत काम करत आहे. रविवारी सकाळी कामाला निघाली तेव्हा दोघेही घरीच होते. संध्याकाळी जेव्हा ती कामावरून घरी आली तेव्हा आईबाबा रक्ताच्या थारोळ्यात दिसले. दोघांची अशी अवस्था पाहून तिने जोरात ओरडण्यास सुरूवात केली. त्यानंतर शेजारी गोळा झाले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. 


पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या हत्येमागचा उद्देश काय हे आता सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले. मी घरी आले तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात होते असे प्रियंकाने पोलिसांना सांगितले. दोघांना का मारले याचा पुरावा अद्याप मिळाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आजुबाजूला राहणाऱ्यांकडे या परिवारासंबंधी चौकशी केली. शंकर आणि सीमा यांचे कोणाशी भांडण नव्हते असे या चौकशीत समोर आले. तसेच घरगुती भांडणाचाही काही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे इतक्या निर्दयीपण हत्या करण्यामागचे कारण पोलीस शोधत आहेत.