नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातल्या डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टरचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. स्वप्नील शिंदे असं या डॉक्टरचं नाव होतं. दरम्यान या डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे. यामध्ये डॉ. स्वप्नील शिंदे याच्या छातीच्या 2 बरगड्या तुटल्या असल्याचं कारण समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉ. स्वप्नील शिंदे संशयास्पद मृत्यूप्रकरणी शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आलेत. याच्या शवविच्छेदनात छातीच्या 2 बरगड्या तुटल्याचं नमूद आहे. डॉक्टर स्वप्नील शिंदे हा या विद्यालयात स्त्री रोग तज्ञ विभागात एमडीच्या दुसऱ्या वर्षाला होता. 


डॉ. स्वप्नील शिंदे याचा मृतदेह महाविद्यालयातील ऑपरेशन थिएटर लगत असलेल्या वॉशरूममध्ये मिळाला. स्वप्नीलने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. मात्र महाविद्यालयातील दोन वरिष्ठ विद्यार्थी त्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केलाय. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार त्याच्या बरगड्या तुटल्यामुळे आता स्वप्नीलने आत्महत्या केली की हा घातपात आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. 


स्वप्नीलच्या कुटुंबियांनी त्याच्यावर रँगिग झाल्याचे आरोप केले होते. स्वप्नीलच्या मृत्यूनंतर मात्र कॉलेज प्रशासनानं मात्र रॅगिंगचे आरोप फेटाळून लावलेत. स्वप्नीलची मानसिक अवस्था ठीक नव्हती. त्याच्यावर वर्षभरापासून उपचार सुरू होते असं कॉलेज प्रशासनाचं म्हणणं होतं. 


आता सध्या रॅगिंगनेच स्वप्नीलचा बळी घेतला का? तसंच घातपातामुळेच त्याला जीव गमवावा लागला का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्य़ाचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.