शहीद सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी असं काही...
शहीद सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यापलीकडे काय करू शकतो तर बरंच काही करू शकतो.
जितेंद्र शिंगाडे / नागपूर : शहीद सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यापलीकडे काय करू शकतो तर बरंच काही करू शकतो. नागपूरच्या एका डॉक्टरांनी काय केले पाहा. त्यांचा हा निर्णय सर्वांसाठी एक आदर्श आणि प्रेरणा देणारा आहे. नागपूरच्या त्रिमूर्ती नगरमधलं हे डॉ. वैशाली अटलोये यांचं त्रिशा आयुर्वेद रुग्णालय. आयुर्वेदात एमडी असलेल्या डॉक्टर वैशाली गेल्या ११ वर्षांपासून रुग्णसेवा करतात. यांच्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लागलेला हा संदेश सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. डॉ. वैशाली अटलोये यांनी सैन्यातले जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजन्म निशुल्क उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.
सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अगदी साध्या रोगांपासून ते जीर्ण व्याधींवर निशुल्क उपचार केले जातील. औषधंही स्वस्त दरात पुरवली जाणार आहेत. देशाच्या कुठल्याही भागात सैनिकांना निशुल्क उपचार देण्याची तयारी डॉक्टर वैशाली यांनी दाखवली आहे. आपण ठरवले तर सैनिकांसाठी बरंच काही करू शकतो. डॉ. वैशाली यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.