नाशिक पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक शहरातील रस्त्यांवर मध्यरात्री हा थरार सुरु होता. स्टॉप अँड सर्च कारवाईत गांजा तस्कर पोलिसांना हुलकावणी देत फरार झाला होता. पोलिसांच्या एका पथकाने सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला होता. पाठलाग सुरू झाल्यानंतर नाशिक शहरातील इतर पोलिसांची तब्बल 5 ते 6 वाहनं मदतीला धावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या वाहनांनी सिनेस्टाईल पाठलाग करत गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या. गांजा तस्करी करणाऱ्या संशयताचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि नाशिक पोलिसांच्या धाडसी कारवाईचं स्वागत केलं आहे. 


एकूण 8 कंट्रोल रुम मोबाईल व्हॅन्स तब्बल तासभर एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे ड्रग्ज तस्करांचा पाठलाग करत होते. यावेळी 28 किलो गांजा जप्त करण्यात आला. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता MH02 क्रमांकाने नोंदणी असणाऱ्या कारने आडगाव येथे स्टॉपवर न थांबता जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर नाशिक पोलिसांनी अलर्ट पाठवून गाडीचा पाठलाग सुरु केला. 



बेकायदेशीर शस्त्रं, अंमली पदार्थ, स्फोटकं किंवा तत्सम प्रतिबंधित वस्तू असण्याचा संशय आल्याने नियंत्रण कक्षाला काही सेकंदात अलर्ट करण्यात आलं. नाशिक शहर पोलिसांचे 8 कंट्रोल रुम मोबाईल व्हॅन्स तात्काळ कारवाईत सहभागी झाल्या. पकडले जाऊ नये म्हणून संशयित मुख्य रस्त्यांवरून पळून गेला. मात्र ते पोलिसांना टाळू शकले नाहीत.


नाशिक शहरात आडगाव, द्वारका यू-टर्न, अमरधाम यू-टर्न, केके वाघ कॉलेज ते चक्रधर स्वामी मंदिरापर्यंत पाठलाग सुरूच होता. झडती घेतली असता कारच्या ट्रंकमध्ये 28 किलो गांजा आढळून आला.


नाशिक शहर पोलिसांनी सांगितले, "रणनीतीनुसार, आमच्या पथकांनी इतरांना कोणतीही हानी न करता ड्रायव्हरला पकडण्यात यश मिळवले." MH 02 म्हणजे कार मुंबईत नोंदणीकृत आहे. ती धुळ्याहून नवी मुंबईकडे जात होती. नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी पाठलाग करणाऱ्या पथकाचा सत्कार केला आहे. "तात्काळ पाठलाग सुरू करणाऱ्या सतर्क जवानांपैकी भाऊराव गांगुर्डे आणि बाळकृष्ण पवार यांचे विशेष कौतुक आहे," असं त्यात म्हटलं आहे. दरम्यान नेटकऱ्यांनीही पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं आहे.