रुग्णवाहिकेतून कोरोना ग्रस्तांचा जीवघेना प्रवास; चालक फोन वर बोलण्यात मग्न
राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथून १६ कोरोना बाधित रुग्ण एकाच रुग्णवाहिकेतून कोंबून नेल्याचा धक्कादायक समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता या रुग्णवाहिकेचा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये या रुग्णवाहिका चालकाच्या दोन्हा हातात मोबाईल असल्याचं चित्र समोर येत आहे. मोबाईलमध्ये व्यस्त असणारा हा चालक कोरोना बधितांना अमरावतीला घेऊन जात आहे.
वाहन चालवत असताना मोबाईल वापरण्यास बंदी असून देखील हा रुग्णवाहिका चालक वाहतुकीचे सर्व नियम ढाब्यावर बसवत एक नाही तर चक्क दोन मोबाईल हाताळत रुग्णांसोबत जीवघेना खेळ खेळत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून वारंवार सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात असतानाच अमरावतीत मात्र प्रशासनाकडूनच या आदेशाला हरताळ फासण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, राज्यात करोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक गुरुवारी नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत १४,४९२ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात राज्यात ३२६ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात मुंबई १,२७५, नागपूर ९२४, नवी मुंबई ४९२, नाशिक शहर ७४५, पुणे शहर १६८२, पिंपरी-चिंचवड १०००, जळगाव ५१५, उस्मनाबाद २६४, कोल्हापूर जिल्हा ५५० रुग्ण आढळले.