पुणेकरांवर अदृश्य शक्तीची नजर? `या` भागात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, गूढ कायम
Pune Drone News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
Pune Drone News: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. या अज्ञात ड्रोनने पुणेकरांची झोप उडवली आहे. पुण्यातील भोर शहरासह ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत. गेल्या आठवडाभरापासून वेगवेगळ्या भागात रात्री 11 ते 2 वाजेच्या दरम्यान ड्रोन घिरट्या घालताना दिसतात. दररोज एकाच वेळी 5 ते 6 ड्रोन घिरट्या घालत आहेत. या सगळ्या प्रकारामुळं नागरिकही धास्तावले आहेत.
रात्रीच्या अंधारात उडवण्यात येणाऱ्या ड्रोनमुळं नागरिक धास्तावले आहेत. नागरिकांमध्ये ड्रोनच्या घिरट्यांनी भीतीचं वातावरण आहे. ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाळणी तर केली जात नाही ना? असा संशय नागरिकांना आहे. पोलिसांनाही अद्याप याचा तपास लागत नसल्याने, ड्रोनचं गुढ कायम. ड्रोन नक्की कोण उडवतयं? त्यामागचा उद्देश कायं?याचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
शिरूर तालुक्यातही ड्रोनच्या घिरट्या
पुण्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस रात्रीच्या अंधारात ड्रोनच्या घिरट्या सुरुच असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या तीन दिवसांपासुन शिरुर तालुक्यातील मलठण, बाभुळसर, कारेगाव, रांजणगाव, बाभूळसर, वरुडे, खंडाळे माथा या परिसरात ड्रोन घिरट्या घालताना दिसुन आले आहेत. तर बाभुळसर येथे नागरिकांनी ड्रोन ताब्यात घेऊन पोलीसांच्या स्वाधीन केलं मात्र ड्रोनच्या माध्यमातून ग्रामीण भागात रेकी का केली जाते याचं उत्तर अद्यापही नागरिकांना मिळत नसल्याने नागरिक भितीच्या छायेखाली असून ड्रोनच्या रेकीचा पोलीसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते आहे.
पोलिस काय म्हणतात?
दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून ड्रोनच्या बातम्या समोर येत आहेत. यावर पोलिसांनीही थेट अॅक्शन घेतली आहे. मागील 15 दिवसांपासून ड्रोनबाबत बातम्या समोर येत आहेत.त्याच्या तपासासाठी एक पथक काम करत आहेत.अँटीड्रोन यंत्रणा आम्ही विकत घेत आहोत. अँटी ड्रोन गनदेखील खरेदी करणार आहोत. ते ड्रोन उतरवल्याशिवाय ते नेमके कुणाचे आणि कोणत्या करण्यासाठी उडत होते ते कळू शकतं नाही. ज्या ठिकाणी असे ड्रोन आढळून येतील त्या ठिकाणच्या नगरिकानी या घटना आमच्या निदर्शनास आणून द्याव्या, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.
मुळशी येथे ड्रोनच्या घिरट्या
पुण्यातील मुळशीमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आलं होतं. असाच एक ड्रोन आकाशात घिरट्या घालत असताना भरे गावातील एका ग्रामस्थाच्या घरावर पडल्याची घटना घडली होती. रात्रीच्या अंधारात उडवण्यात येणाऱ्या या ड्रोनमुळे परिसरात संशयाचं तसेच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हे ड्रोन चोरीच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी वापरले जात असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. तर हे ड्रोन मुलांच्या खेळण्यातील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.