जालना : जालना जिल्हा हा मोसंबीचा गड म्हणून ओळखला जातो. पण मोसंबीचा गड अशी असलेली ओळख आता पुसट होत चालली आहे. गेल्या 7 वर्षात जिल्ह्यातील मोसंबीच्या क्षेत्रांत मोठी घट झाली आहे. 2013 साली 36 हजार हेक्टर असलेलं मोसंबीचं क्षेत्र आता तब्बल 17 हजार हेक्टरवर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2013 साली जिल्ह्यात मोठा दुष्काळ आला. त्यानंतर सलग 3 वर्ष कमी पडलेल्या पावसामुळे मोसंबीच्या बागा शेतकऱ्यांना तोडाव्यात लागल्या. परिणामी मोसंबीच्या जिल्ह्यातील उत्पादनात मोठी घट आली. सतत बदलणारं हवामान, मोसंबीवर येणारी रोगराई या गोष्टींना कंटाळून शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवली.


जिल्ह्यात आजच्या घडीला 17 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 10 हजार हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष उत्पादनक्षम आहे. ज्यापासून शेतकऱ्यांना दरवर्षी उत्पादन मिळतं. जिल्ह्यात दरवर्षी दीड हजार मॅट्रिक टन उत्पादन मोसंबीपासून मिळतं. ही मोसंबी दक्षिण भारतात विक्रीसाठी पाठवली जाते. मोसंबीचं घटलेलं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या योजनांमधून प्रयत्न करतोय. त्याला हळूहळू यश देखील येऊ लागलंय.


मोसंबी क्षेत्रांत वाढ होण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजनांमधून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यानी मोसंबी लागवड करताना आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे हे पाहून मोसंबी लागवड करावी तसंच लागवडीसोबत ठिंबक सिंचन देखील करावं, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.


यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परिणामी पुन्हा मोसंबीला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, जेणेकरुन मोसंबीचं गेलेलं गतवैभव पुन्हा प्राप्त होईल.