जमिनीच्या भेगा कशा भरणार केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक?
दुष्काळग्रस्तांना आता मदतीची प्रतीक्षा आहे
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मराठवाड्यातील भीषण दुष्काळ आहे. आता याचीच पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात केंद्राचं पथक दाखल होणार आहे. १० जणांची ही टीम मराठवाड्यातील काही गावात आजपासून पाहणी कऱणार आहे. पावसाअभावी शेतीचं नुकसान... पोटच्या लेकरागत जपलेल्या पिकाची झालेली अशी ही अवस्था... वरूणराजा रुसल्याने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. ही विदारक दृश्यं आहे मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाचं... मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालाय. केंद्र सरकारला ७ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आलाय. याच प्रस्तावाची चाचरपणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक आजपासून मराठवाड्यात दुष्काळाची पाहणी करणार आहे.
हे पथक काही गावांना भेट देवून परिस्थितीची पाहणी करणार आहे. पावसाची आकडेवारी, पिक परिस्थिती, भूजल पातळी, आर्थिक अवस्था, सुरु असलेल्या उपाययोजना या सगळ्या गोष्टींची चाचपणी हे पथक तीन दिवसांत करणार आहे. यानंतर एक सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. १० जणांचे हे पथक असून यातून तीन वेगवेगळी पथकं मराठवाड्यातील वेगवेगळ्यात गावात भेटी देणार आहेत. दुष्काळग्रस्तांना आता मदतीची प्रतीक्षा आहे.
केंद्राचं पथक मराठवाड्याला नवीन नाही आतापर्यंत प्रत्येकच दुष्काळात केंद्राचं पथक पाहणीला आलंय. मात्र त्यानंतरही मिळणाऱ्या मदतीला वर्षभरापेक्षा जास्त काळ लागलाय. मात्र यंदाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आता सरकारने दुष्काळग्रस्तांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी तर त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल...