सातारा जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट; 120 गावे आणि 388 वाड्याना टँकरद्वारे पाणी पुरवठा
साताऱ्या जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात 120 गावे आणि 388 वाड्याना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
Satara District Draught : सातारा जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी झाल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातच 120 गावे आणि 388 वाड्यांना आताच 112 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करावा लागतो आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती यापेक्षा आणखी गंभीर होवू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे.
तापमानाचा पारा वाढला आहे. सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढला आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्यावर त्याचा परिणाम झाला आहे. गावातील विहिरी,ओढे, पाझर तलाव आणि बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
दुष्काळी अनुदान न मिळाल्या निवडणुकांवर बहिष्कार
मालेगावच्या मेहुणे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दुष्काळी अनुदान न मिळाल्याने ग्रामस्थांनी आगामी लोकसभेसह येणा-या सर्वच निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसा फलकच त्यांनी गावाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या पुढ-यांनाही गावबंदी केली आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मेळघाटातील काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. गेल्या 75 वर्षांपासून मेळघाटचा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही.. आदिवासी बांधवांना हंडाभर पाण्यासाठी जंगलात वणवण करावी लागतेय..खडीमल गावात एका विहिरावर हंडाभर पाण्यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पवना धरणात 44.72 टक्के तर आंद्रा धरणात 55.48 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक
पिंपरी-चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागविणाऱ्या पवना धरणात 44.72 टक्के तर आंद्रा धरणात 55.48 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तीव्र उन्हामुळे होणा-या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे. उपलब्ध पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मात्र, पावसाळा लांबल्यास शहराला पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जळगावात भीषण पाणी टंचाई
उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस 42 गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून 51 टँकर सुरू करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई ही चाळीसगाव तालुक्यात असून चाळीसगाव तालुक्यातील एकूण 26 गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती आहे या ठिकाणी 31 टँकर सुरू करण्यात आले आहे. तर चाळीसगाव खालोखाल अमळनेर तालुक्यातील बारा गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती असून या ठिकाणी १६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.. तर भुसावळ व पारोळा या तालुक्यात प्रत्येकी एका गावात तर भडगाव तालुक्यात दोन गावांमध्ये पाणी टंचाई असून पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे.