अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र कोरडाठाक, पावसासाठी बोकडाचा बळी
अस्मानी संकटातून वाचवण्यासाठी बळीराजानं पारंपरिक पद्धतीनं देवाला साकडं घातलं
मुंबई : यंदा जुलै महिना संपत आला असताना राज्यातील पाणी परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राज्यातील कोकणमध्ये समाधानकारक पाऊस सुरू आहे. तर नाशिक, नगर आणि पश्चिम महाराष्ट्रमधील काही भागातील पाऊस वगळता मराठवाडा, विदर्भ अजूनही कोरडेठाक आहेत. सध्या राज्यातील धरणं आणि जलाशयामध्ये फक्त २४.९६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच्या दुप्पट पाणीसाठा म्हणजे सुमारे ४७ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.
कोकणातील स्थिती समाधानकारक असून तिथे धरण आणि जलाशयांमध्ये ६८ टक्के पाणीसाठा झालेला आहे. पुण्यात ३७.९६ टक्के, नाशिक विभागात २०.५२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र औरंगाबाद विभागात ०.८२ टक्के म्हणजेच एक टक्काही पाणीसाठा आजही शिल्लक नाहीये. तर नागपूर विभागात फक्त ८.२७ टक्के, तर अमरावती विभागात ८.७९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
पाऊस नसल्याने राज्यात आजही अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे चित्र आहे. राज्यात ३६५७ गावांमध्ये आणि ९१४९ वाड्यांमध्ये एकूण ४७१६ टँकरच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे.
पावसासाठी बोकडाचा बळी
पावसाळ्याचा दुसरा महिना सुरू असतानाही चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस बरसला नाही. परिणामी कपाशी, भात पीक करपू लागलं. या अस्मानी संकटातून वाचवण्यासाठी बळीराजानं पारंपरिक पद्धतीनं देवाला साकडं घातलं. गोंडपिंपरी तालुक्यातल्या धाबा गावात वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी पूजा केली. भीषण दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी 'पाऊस पाड गा देवा...!' अशी हाक देत अनेक गावात धार्मिक विधी केले जात आहेत. धाबाच्या ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करुन भिवसन देवाला साकडं घातलं. यासाठी देवाला बोकडाचा बळी देण्यात आला. देवाची पूजा करण्यात आली. महिलांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन वाजतगाजत मिरवणूक काढली. गावाच्या वेशीवर पाराखालच्या देवाची पारंपरिक पूजा केली. झेंडे अर्पण केले गेले.