छत्रपती संभाजीनगरात सापडले 250 कोटींचे ड्रग्ज! गुजरातमधील इंजिनिअरला थेट कारखान्यातून अटक
Chhatrapati Sambhaji Nagar : नाशिकनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्जचा कारखाना सापडला आहे. अहमदाबाद पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. संभाजीनगमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापड्याने खळबळ उडाली आहे.
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील (Nashik) ड्रग्ज प्रकरणाचा गुंता सुटता सुटत नसताना आता छत्रपती संभाजीनगमध्येही (chhatrapati sambhaji nagar) अमली पदार्थांचा (Drugs Racket) मोठा साठा सापडला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांच्या मोठ्या व्यापाराचा पर्दाफाश झाला आहे. अहमदाबाद पोलीस आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) रविवारी दोन जणांना अटक केली आहे. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी महसूल गुप्तचर संचालनालयाने अमली पदार्थ बनवण्याच्या कामात सहभागी असलेली फॅक्टरीवर छापा टाकला होता. अहमदाबाद पोलीस आणि डीआरआयने या फॅक्टरीसह शहरात तीन ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 250 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अहमदाबाद डीआरआय आणि अहमदाबाद पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आले होते. रविवारी सकाळपासून हे छापसत्र सुरू होते.
या कारवाईत जालना रोडवर एक आरोपीच्या घरातून 23 किलो कोकेन, तीन किलो मेफेड्रोन आणि 30 लाख लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच पैठण एमआयडीसीमध्ये महालक्ष्मी इंडस्ट्री या कारखान्यात अमली पदार्थाचे उत्पादन सुरु असल्याचीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या कारखान्यातून 4.5 किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाईन आणि 9.3 किलो वजनाचे मेफेड्रोनचे एक मिश्रण जप्त करण्यात आले आहे.
बाजार मूल्यानुसार हे सगळे अमली पदार्थ 250 कोटींच्या घरात होते. नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स (एनडीपीएस) अधिनियम, 1985 नुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदाबाद पोलीस आणि डीआरआयने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी गुजरातचे होते. गुजरातमध्ये जो अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता त्याच्याशी या छापांचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सध्या तपास यंत्रणा याबाबत माहिती देत नाहीयेत. तपास पूर्ण झाल्यावर याबाबतची अधिक माहिती देता येईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
केमिकल इंजिनिअर पोलिसांच्या ताब्यात
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जितेश हिन्होरिया नावाच्या केमिकल इंडिनिअरचा देखील समावेश आहे. संशयित जितेश हिन्होरिया याने दीड वर्षांपूर्वी अंमली पदार्थ निर्मिती सुरू करून छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला व्यवसाय थाटल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली. मूळचा सुरतचा रहिवासी असलेला हा इंजिनिअर ड्रग्जचा कारखाना चालवायचा. त्याची स्वतःची फॅक्टरी होती, जिथे तो ड्रग्ज तयार करत असे. हा इंजिनिअर मुंबई आणि इतर शहरांमध्ये खास आणि हाय-प्रोफाइल रेव्ह पार्ट्यांना ड्रग्ज पुरवायचा.
या कारखान्यात तयार होणारे अमली पदार्थ केवळ महाराष्ट्र आणि गुजरातमध्येच नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि अन्य राज्यांमध्येही पाठवली जात होती. पोलीस सूत्रांनी सांगितले की, चेन्नई हे केटामाइनची मोठी बाजारपेठ आहे, तर सुरतमध्ये मेफेड्रोनचे अनेक ग्राहक आहेत.