अमरावती : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. तर अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एकाच कुटुंबातील चार कोरोना बाधितांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणायला गेलेल्या रुग्णवाहिकेवर एका मद्यधुंद कोरोना संशयित रुग्णाने दगडफेक केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धनोडी मलकापूर गावात घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी या प्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल केला आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धनोडी मलकापूर येथील एकाच कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती रुग्णवाहिका चालकाला मिळाली होती. त्याप्रमाणे रुग्णवाहिका घेऊन चालक भातकुली धनोडी मलकापूर गावात गेला. 


त्यानंतर कोरोना बधित कुटूंबातील मध्य प्राशन केलेल्या एका कोरोना संशयित रुग्णाने रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. यामध्ये रुग्णवाहिकेचं नुकसान झालं आहे. हा मद्यधुंद कोरोना संशयित रुग्ण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने उपस्थित लोकांना शिवीगाळही केली. दरम्यान या प्रकरणी खोलापूर पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.


महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे. एका दिवसामध्ये कोरोनाचे १२,८२२ रुग्ण सापडले आहेत. तसंच २७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५,०३,०८४ एवढी झाली आहे.