डीएसकेंनी १२०० कोटींचा घोटाळा केल्याचा सोमय्यांचा आरोप
पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी १२०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनी केला आहे.
पुणे : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी १२०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनी केला आहे.
मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय आणि पीएफ आयुक्तांकडे सोमय्या यांननी लेखी तक्रार केली आहे. डीएसकेंनी २०१५ सालापासून ७५० कर्मचाऱ्यांचा पीएफ देखील जमा केला नसल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
त्यामुळे सध्या व्यावसायिक असमतोलात असलेल्या डिसकेंच्या अडचणीत अधिकच वाढ झाल्याचे दिसत आहे.
'घराला घरपण देणारी माणसं' या आकर्षक कॅचलाईनने प्रसिद्धीस आलेल्या डिएसके उद्योगाला सध्या आर्थिक घरघर लागली आहे.
नोटबंदीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या डीएसकेंनी पुण्याजवळच्या ड्रीम सिटी जमीन घोटाळ्यात आपल्या कुटुंबियांना आर्थिक फायदा करून दिल्यानेच त्यांच्यावर ही आर्थिक मंदीची परिस्थिती ओढवल्याचा आरोपही डिएसकेंवर होत आहे.
डीएसके यांच्यावर 8 हजार गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप होत आहे. डीएसकेंनी घेतलेल्या गुंतवणुकीवर ठरल्याप्रमाणे व्याजही दिलं नसल्याचा आणि मुदत ठेवीच्या रकमाही परत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रारींचे सहा अर्ज आलेत. या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करून सरकारी वकिलांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करणार असल्याचं शिवाजीनगर पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.