डीएसकेंच्या मालमत्तेची विक्री होणार... तरीही गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला
डीएसकेंवर कारवाई होऊनही गुंतवणूकदार उपाशीच राहणार आहेत.
पुणे : आर्थिक फसवणुकीप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मालमत्तेची विक्री केल्यानंतर जमा झालेल्या पैशांमधून सर्वांची देणी दिल्यानंतर गुंतवणूकदारांची देणी दिली जाणार आहेत. त्यामुळे डीएसकेंवर कारवाई होऊनही गुंतवणूकदार उपाशीच राहणार आहेत. कारण कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार सर्वात आधी सरकारी देणी भागवली जाणार आहेत. त्यानंतर डीएसकेंच्या कर्मचाऱ्यांचे पगार दिले जाणार. नंतर बँकांना त्यांचा पैसा चुकता केला जाणार त्यानंतर सर्वात शेवटी ठेवीदारांना त्यांची गुंतवणूक दिली जाणार आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागलाय.
कुलकर्णींविरोधात आरोपपत्र दाखल
दरम्यान, आर्थिक फसवणूकीच्या आरोपात तुरुंगात असलेल्या डी एस कुलकर्णींच्या विरोधात पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात हे तब्बल ३६ हजार पानाच्या या आरोपपत्रात डीएस पोलिसांनी केलेल्या चौकशीसह पुराव्यांचे तपशील देण्यात आले आहेत.
१७ फेब्रुवारीला डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली. डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर भारतीय दंडविधानाच्या विविध कलमानुसार अनेक फसवणूकीचा आरोप लावण्यात आलाय. शिवाय एमपीआयडी कायद्यांर्गतही आरोप लावण्यात आले आहेत. घोटाळा तब्बल २ हजार ४३ कोटींचा असल्याचंही पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केलंय.
आणखीन तिघांना अटक
दरम्यान डीएसके घोटाळा प्रकरणी बुधवारी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी डीएसकेंच्या कंपनीत महत्वाच्या पदांवर काम करणारे आणि डीएसकेंचे नातेवाईक आहेत. धनंजय पाचपोर, केदार वांजपे आणि सई वांजपे यांचा यात समावेश आहे. यातील वांजपे डीएसकेंचे चुलत जावई आहेत.