तुषार तपासे, सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीचे नियम सरकारनं बदलले आहेत. आता सरपंचपदाचं आरक्षण निकालानंतर काढण्यात येणार आहे. त्यामुळे गावाकडच्या नेत्यांची गोची झाली आहे. शिवाय गावांमध्ये निवडणुकीची म्हणावी तशी हवा नाही आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत आधी सरपंचपदाची सोडत व्हायची आणि नंतर निवडणूक. मात्र सरकारनं नियम बदलले आणि आता आरक्षण नंतरच निश्चित होणार आहे. यामुळे गावागावातला नूर पालटला आहे. आतापर्यंत पॅनेल प्रमुख सगळी यंत्रणा राबवायचे. खर्चाचा बहुतांश भार हा इच्छुकाच्या खांद्यावर असायचा. आता मात्र 'खर्च केला आणि आरक्षण भलतंच पडलं, तर काय' या शंकेची पाल इच्छुकांच्या डोक्यात चुकचुकते आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांची गोची झाली आहे. 


दुसरीकडे या निर्णयाचं स्वागतही होतंय. निवडणुकीतील चुकीच्या गोष्टींना यामुळे आळा बसेल, असं मत काही जण मांडत आहेत.


गावागावात मोर्चेबांधणी झाली आहे. राजकारण तापू लागलं आहे. इच्छुक उमेदवारांसह स्थानिक नेते तयारीला लागले आहेत. अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून सजले असले तरी नेमकं सरपंचपदाच्या घोड्यावर कोण बसणार, हे नंतरच समजणार असल्यामुळे खरी रस्सीखेच ही निकालानंतर होईल.


त्यामुळेच निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी नेहमीचं उत्सवी वातावरण अद्याप दिसत नाहीये. आता गावकारभार पाहणारे जाणते नेते यातून कसा मार्ग काढतात, हे बघावं लागेल.