वातावरणातील बदलामुळे ज्वारीचं पिक अडचणीत
पिकावर करपा आणि चिटका रोगाचा प्रादुर्भाव
हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरुर : सध्याच्या वातावरणातील बदलामुळे ज्वारीचं पिक अडचणीत आलं आहे. पिकावर करपा आणि चिटका रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शिरुरमधला शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. जनावरांचा चारा आणि धान्य मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल या आशेने रब्बी हंगामात डोंगराळ आणि जिरायत शेतीत मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड करण्यात आली. मात्र सध्याची थंडी आणि वातावरणातील धुक्यामुळे ज्वारीला दाणा भरलाच नाही तर ज्वारीची वाढही कमी जास्त प्रमाणात होते आहे.
शेतकऱ्यांनी कृषी सल्ला घेऊनच उपाययोजना करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येतं आहे. तर ढगाळ हवामानामुळे ज्वारी पिकाला तांबेरा चिकटा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
पुणे जिल्ह्यातल्या ज्वारीच्या उत्पन्नावर एक नजर टाकली तर, पुणे जिल्ह्यात जवळपास 2 लाख 924 हेक्टर क्षेत्रापैकी 1 लाख 52 हजार 240 हेक्टर वरती ज्वारीचं उत्पन्न घेतलं जातं. सततच्या अस्मानी संकटांनी पुरत्या खचलेल्या बळीराजाला सरकार काय मदत करते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.