जुन्नर : वर्षभर शेतात कष्ट उपसल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल यायच्या वेळी परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरुर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने संपूर्ण शेतीच वाहून गेली आहे. कांदा, टॉमॅटो, फ्लॉवर, कोबी, सोयाबीन, ज्वारी, मका यासारख्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडांची पडझड झाली. तर उसाची शेतीही भुईसपाट झाली आहे. पिकांचे लवकर पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी बळीराजाची अपेक्षा आहे. 


वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे छप्पर उडून गेलं आहे. तर अनेक शेतकऱ्यांना दुखापतही झाली आहे. 


  


पावसाच्या तडाख्याने मराठवाड्यातही मोठं नुकसान झालं आहे.  तब्बल २९ लाख हेक्टरवरील पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ३० लाखांवर शेतकरी यात भरडला गेलाय. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन, कापूस आणि ज्वारीचं प्रचंड नुकसान झालं आहे. 


अवकाळी पावसानं राज्यातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला. नुकसान झालेल्या भागांचं तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे, पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. स्थानिक गावकर्‍यांनी नुकसानीचे काढलेले छायाचित्र सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र आता परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानंतर, आता सरकारकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी रास्त अपेक्षा शेतकरी करत आहेत.