पुणे: दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दूध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय. पुण्यात चितळे दूधाचं सर्वाधिक वितरण होतं. चितळेंकडे दिवसाला सुमारे साडेसहा लाख लिटर दूध संकलन होतं. मात्र त्यांचं दूध संकलन दोन दिवस बंद आहे. त्यामुळे आज साठवणूकीतील दूधाचं वितरण करण्यात आलं. किंवा चितळे ऐवजी जे उपलब्ध आहे ते दूध वितरित करण्यात आलं. कात्रज दूध संघाच्या संकलनावरही परिणाम झालाय. त्यांच्याकडे सव्वा लाख लिटर दूधाचं संकलन होतं. सोमवारी मात्र ते केवळ ६० हजार लिटर इतकच झालय. या पार्श्वभूमिवर आज दूधकोंडी फुटली नाही तर उद्या दूध वितरण शक्य होणार नसल्याचं संबंधितांनी सांगीतलय. शहरातील इतर दूधसंकलकांचीही चितळेंप्रमाणेच दूधकोडी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पोलीस संरक्षणातील टँकर फोडले 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध दर आंदोलनाची झळ राजधानी मुंबई आणि प्रमुख शहरांना बसू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दूधाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी दूधाच्या टँकर्सना पोलीस संरक्षणही सरकार पुरवत आहे. पण, त्याचा आंदोलनावर काहीही फरक पडत नसल्याचे पुढे आले आहे. दूधाची वाहतूक खंडीत करण्यासाठी आणि आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी आंदोलकांनी 'गनिमी कावा' निती आवलंबली आहे. याच नितीचा वापर करत आंदोलकांनी पोलीस संरक्षणात दूध वाहतूक करणारे टँकर फोडल्याचे वृत्त आहे. ही घटना कोल्हापूरमध्ये घडली.


दूध आंदोलनाचा परिणाम राज्यभर


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध संपाचा आज मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची चिन्हं आहेत. कालपर्यंत असलेला दूध साठा हा संपत आल्याने आणि आज सकाळी दूधाचे टँकर आवश्यक प्रमाणात न आल्याने शहरांना आंदोलनाची झळ बसण्याची शक्यताय. दुग्धविकास मंत्र्यांनी मात्र मुंबईला १५ दिवस पुरेल इतका साठा असल्याचा दावा केलाय... मुंबईची रोजची दूधाची गरज ५० ते ५५ लाख लीटरची आहे.आंदोलनामुळे कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, मध्यप्रदेश आणि कर्नाटकचा पुरवठा तुटण्याची भीती आहे. अशा वेळी एवढी मोठी गरज कशी भागणार, हा प्रश्न आज तरी  निरुत्तरीत आहे. दरम्यान आज सकाळी पोलिस संरक्षणात दहिसरहून दूधाचे काही टँकर मुंबईत आणण्यात आले.