उपाययोजना आखा! गणेशोत्सवाच्या धामधुमीत निपाहमुळे महाराष्ट्र सतर्क; राज्याच्या साथरोग विभागाचे निर्देश
Nipah Virus : कोरोनापेक्षा वेगाने फिरणाऱ्या निपाह व्हायरसने केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. केरळमध्ये निपाहमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांना याची लागण झाली आहे. त्यामुळे इतर राज्यही हायअलर्टवर आहेत. महाराष्ट्राच्या साथरोग विभागानेही याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाह विषाणूचा (Nipah Virus) उद्रेक झालेला असतानाच महाराष्ट्रसुद्धा (Maharashtra) हायअलर्टवर आहे. केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत चालली आहे. कर्नाटकनेही निपाहचं संकट पाहून कर्नाटक (Karnataka) सरकारने अलर्ट जारी केला होता. अशातच आता महाराष्ट्र राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यामध्ये निपाह विषाणूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. अशातच राज्याच्या साथरोग विभागाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
केरळमधील निपाहाच्या वाढत्या संकटामुळे राज्याच्या साथरोग विभागाने सर्व जिल्ह्यांच्या आरोग्य विभागाला निपाहबाबत सर्वेक्षण आणि खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्याच्या हिवताप व जलजन्य रोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी हे महत्त्वाचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडतात. त्यामुळे निपाह पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्याचा साथरोग विभाग सतर्क झाला आहे.
"निपाहचा राज्याला फारसा धोका नसला तरी आपण महाराष्ट्रातही खबरदारी घेणे आवश्यक आहे. निपाहसदृश आजाराचे (मेंदूज्वर, इईएस) सर्वेक्षण सर्व स्तरावर करावे. तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना आखाव्यात," अशा सूचना डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिल्या आहेत.
केरळमध्ये सध्या काय परिस्थिती?
केरळमध्ये निपाह व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. केरळ सरकारचे म्हणणे आहे की 61 लोकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत आणि यासोबत एकही नवीन प्रकरण नोंदवण्यात आलेले नाही. निपाहच्या शेवटच्या रुग्णाची नोंद 15 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती.
निपाहची लक्षणं काय?
जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला खूप ताप, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणं दिसतात. परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती 24 ते 48 तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते. निपाह व्हायरसची लक्षणं 5 ते 14 दिवसात दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये हा काळ 45 दिवसांपर्यंत वाढू शकतो. काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला अजिबात लक्षणं दिसत नाहीत.
काय काळजी घ्यावी?
जर तुम्हालाही आपल्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची शंका असेल तर आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्या. याशिवाय पीसीआर, सीरम न्यूट्रिलाइजेशन आणि एलाइजा टेस्टच्या माध्यमातून व्हायरसची माहिती घेऊ शकता.