विकास भदाणे, जळगाव : वांग्याचं भरीत किंवा शेवभाजी म्हटली म्हणजे चटकन खान्देश डोळ्यासमोर येतो. त्यातही भरीतासाठी जळगावचं नाव समोर येतं. यंदा मात्र अत्यल्प पावसामुळं वांग्याचं उत्पादन घटलं आहे. पण तरीही थंडीत भरताच्या वांग्याची चव चाखण्यासाठी खवय्ये आसुसलेले असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावच्या मातीतली वांगी खूप चवदार असतात. थंडी पडायला सुरुवात झाली की खवय्यांना हटकून भरताच्या वांगीची आठवण येते. जिल्ह्यातील असोदा, भादली त्यासोबतचं बामणोद तसंच जामनेर तालुक्यातील सुमारे पाचशे एकर क्षेत्रावर दरवर्षी भरिताच्या वांग्याचं उत्पादन घेतलं जात. यामुळं भरीतासाठी लागणारी खास दर्जेदार वांगी जळगावच्या बाजारात सहज उपलब्ध होतात. काही जण हॉटेलमध्ये तर काही जण शेतात जाऊन भरीत पार्टीची मजा लुटतात. या लज्जतदार भरीताची चव सर्वदूर पसरली आहे. 


जळगावात जागोजागी भरीत विक्रीचे अनेक हॉटेल्स आहेत. भरीत तयार करण्याची पद्धतही अगदी घरगुती असल्यानं त्याची चव न्यारी लागते. लाकडाच्या भट्टीत वांगी भाजली जातात. काळी ठिक्कर पडल्यावर या वांग्याचं साल दूर करून आतला गाभा काढण्यात येतो, त्यात तेल, मिरची, लसूण, मीठ घातल्यास तयार होतं चविष्ट भरीत....त्यामुळं हिवाळ्यात मित्रांसोबत पार्टी म्हंटली म्हणजे त्यात भरीताचा समावेश हवाच.


कुठे चविष्ट भरीत मिळतं याकडं खवय्यांची नजर असतेच...या व्यवसायातून अनेक महिलांनाही रोजगार मिळालाय. महिला हॉटेल्समध्ये भाकरी टाकायला येतात. थंडीच्या मोसमात तुम्ही कधी खानदेशात आलात तर जळगावातील भरीत-भाकरीची चव चाखल्याशिवाय परतू नका...