ओडिशा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिकचे दोघेजण झाले मालामाल; बँकेत जमा झाले एक कोटी
Nashik Crime News : ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला कॉपीराईट इन्फोटेक या संस्थेच्या खात्यावर एक कोटी रुपये ट्रान्स्फर करायचे होते ते नाशिकमधील दोघांच्या खात्यावर जमा झाले.
सोनू भिडे, झी मिडिया, नाशिक : नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. ओडिशा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिकचे दोघेजण मालामाल झाले. यांच्या बँक खात्यात एक कोटी रुपये जमा झाले. मात्र, त्यांनी ही रक्कम परत न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या नजर चुकीने खासगी बँकेत जमा झालेले एक कोटी रुपये शासनाला परत न करता स्वत:च्या इतर खात्यांत वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी ओडिशातील संबंधित कार्यालयाचे सुशिलकुमार दुतीया कुजूर (रा. राजपूर, ता. सबडेगा, जि. सुंदरगड, ओडिसा) यांनी नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून वरदकुमार रजनीकांत पटेल आणि शाश्वत शहा या संशयित खातेधारका विरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना
ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला कॉपीराईट इन्फोटेक या संस्थेच्या खात्यावर एक कोटी रुपये ट्रान्स्फर करायचे होते. 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कार्यालयाने ऑनलाईन पैसे वर्ग केले. परंतु संबंधित व्यक्तीकडून नजरचुकीने खातेक्रमांक चुकला आणि ऑनलाईन वर्ग करण्यात आलेली एक कोटी रूपयांची रक्कम नाशिकच्या गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथील एचडीएफसी बँकेत दोघा संशयितांच्या खात्यावर जमा झाली.
अस झाले उघड
27 ऑक्टोबर 2023 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हा प्रकार घडला. रक्कम चुकीच्या खात्यात जमा झाल्याची बाब सुंदरगड समाज कल्याण कार्यालयाच्या निदर्शनास आली. यानंतर कार्यालयाकडून गेल्या तीन महिन्यांपासून पैसे परत मिळण्यासाठी बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र रक्कम परत मिळत नसल्याने अखेर सुंदरगड समाज कल्याण कार्यालयाचे अधिकारी कुजूर नाशिकमध्ये दाखल झाले.
बँकेत चौकशी केली असता, दोघा संशयितांच्या खात्यावर सदरची रक्कम जमा झाली असल्याचं लक्षात आलं. रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर संशयितांनी सदरची रक्कम कुठून आली याची चौकशी नकरता संपूर्ण रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करून घेतली. याप्रकरणी खातेधारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे करत आहेत.