अहमदनगर : शिर्डीत प्लेगची साथ रोखण्यासाठी श्री साईबाबांनी सन १९११ -१२ दरम्यान स्वतः शिर्डी गावच्या सीमेवर पिठाची सीमारेषा आखली होती. शिर्डी गावाच्या याच सीमेवरून श्री साईबाबा परिक्रमा करत असत. त्यास उल्लेख साईसतचरित्र ग्रंथातही आढळतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या धर्तीवर ग्रीन अँड क्लिन शिर्डीच्या वतीने तीन वर्षापूर्वी साई परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला. मात्र, कोविड काळामुळे या परिक्रमा उत्सवात खंड पडला होता. मात्र, कोरोनाचे सर्व नियम शिथील झाल्यानंतर आज पुन्हा ही शिर्डी परिक्रमा सुरु झाली.


तब्बल १११ वर्षानंतर याच सीमेवरून शिर्डी परीक्रमा काढण्यात आली. या परिक्रमेत देशविदेशातील जवळपास दहा हजार साईभक्त सहभागी झाले. शिर्डीत श्री साईबाबा संस्थान आणि ग्रिन एन क्लिन शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी परीक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


श्री क्षेत्र खंडोबा मंदीर येथून काढण्यात आलेल्या या शिर्डी परिक्रमा उत्सवास मोठ्या भक्तीभावाने प्रारंभ झाला. सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज व प.पू.काशिकानंदगिरी महाराज यांच्या हस्ते साई परिक्रमा रथाचे विधीवत पूजन करण्यात आले.


ग्रिन एन क्लिन शिर्डी आयोजित शिर्डी परिक्रमेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. परिक्रमेच्या मिरवणुकीत इंदोर येथील पथक, साईनिर्माण, संजीवनी इंग्लिश मिडीयमचे विद्यार्थी, गुरुकुल, द्रोणा अकादमीचे विद्यार्थी यांनी सादर केलेल्या साईबाबांच्या चित्ररथ हे मुख्य आकर्षण होते. संबळ वाद्य, भजनी मंडळ, डिजे यांंचा या परिक्रमेत समावेश होता. 


परिक्रमा मार्गावर रांगोळ्या काढून परिक्रमा करणाऱ्यांचे स्वागत केले जात होते. पाच हजार महिला भगिनींनी फेटे बांधून या परिक्रमेत आपला सहभाग दर्शवला होता. साईनामाचा गजर तसेच घोषणा देत भक्तिभावाने ही परिक्रमा पुर्ण करून साईभक्त म्हाळसापती श्री खंडोबा मंदीरासमोर समारोप करण्यात आला.