दापोली, रत्नागिरी : दापोलीत डम्पर आणि मॅक्सिमोमध्ये झालेल्या भीषण अपघात पाच जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दापोली खेड मार्गावरील नारगोली इथं सकाळी साडे सातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. जखमींना अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आलं आहे. शुक्रवारी सकाळी संदीप शेलार हे मॅक्झिमो गाडी घेऊन चालले होते. त्यांची गाडी नारगोली इथल्या इंद्रधनू बागेजवळ आली असता समोरून येणाऱ्या डम्परला मॅक्झिमोची जोरदार धडक बसली. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या डम्परला ही धडक बसली असल्याचं म्हटलं जात आहे. ही धडक एवढी भीषण होती, की यामध्ये संदीप शेलार यांचा जागीच मृत्यू झाला. तसंच या अपघातात मधुकर कांबळे, जयदीश पारतुले आणि मदिया शेख, ठेमीदा शेख हेही जागीच ठार झाले.


मधुकर कांबळे हे दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी असून ते पाणी पुरवठा विभागात कार्यरत होते तर गंभीर जखमी झालेले निलेश पवार आणि संदीप पावसकर यांना मुंबईत हलविण्यात आलं आहे. संदीप पावसकर हे आडेगावचे असून ते उपसरपंच आहेत.