दिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे.
Latur Earthquake : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या भूकंपाची भीती सरली नसतानाच आता महाराष्ट्रातही धरणीकंपाची दहशत पाहायला मिळत आहे. कारण, लातूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. वारंवार होत असलेल्या भूकंपाने लातूरकर दहशतीत आले आहेत. हासोरी आणि उस्तुरी भागात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिक भयभीत झाले. यामुळे नागरिकांवर रात्र घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे. 1.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.
मात्र, सौम्य धक्के सातत्याने बसत असल्याने पाहणी करण्यासाठी नागरिकांनी तलाठी, नायब तहसीलदारांची भेट घेतली आणि भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली. प्रशासकीय पातळीवर नागरिकांच्या जीवितासाठी कोणतीही हालचाल होताना दिसली नाही. ज्यानंतर नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून संताप व्यक्त केला.
दिल्लीतही जाणवलेले भूकंपाचे धक्के
काही दिवसांपूर्वीच एका डच संस्थेनं पाकिस्तानला इशारा देत तिथं विनाशकारी भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवली होती. पाकिस्तानच्या सीमेलगत भूगर्भीय हालचाली पाहता ही चिन्हं एखाद्या भूकंपाकडेच खुणावतात असं या इशाऱ्यामध्ये म्हटलं गेलं होतं. ज्यामुळं नागरिकांसह यंत्रणांनाही सतर्क करण्यात आलं होतं. पाकिस्तानमधील यंत्रणांनी मात्र हा इशारा धुडकावून लावला.
हेसुद्धा वाचा : अरे देवा! मुंबईकरांनो, चार दिवस वाहतूक कोंडीचे; 'या' पुलावरील वाहतूक बंद
डच संस्थांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतरच भारतातील दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत जाणवलेल्या दोन धक्क्यांपैकी एका धक्क्याची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी असल्याचं सांगण्यात आलं होतं. नेपाळमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलं. तिथं अफगाणिस्तान आणि जम्मू काश्मीरमध्येही यावेळी भूकंपाचे हादरे जाणवले. या घटनेला दोन दिवसही पूर्ण होत नाहीत तोच लातूरमध्ये धरणीकंप जाणवला. ज्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.