पालघर : गेल्या तीन महिन्यांपासून पालघरमध्ये भूकंपाची मालिका सुरूच आहे. आज पुन्हा एकदा पालघरमधील डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे धक्के बसले. ३.३ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सतत भूकंपाच्या दहशतीत राहणाऱ्या अनेक ग्रामस्थांनी घरे सोडली आहेत. तर अनेकांनी भूकंप कधीही होईल या भीतीने घराबाहेर मंडपात संसार मांडला आहे. 


गेल्या आठवड्यात डहाणू, तलासरीत सलग चार भूकंपाचे हादरे बसले होते. यात एका २ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. प्रशासनाकडून परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे. भूकंपाच्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी भूकंपग्रस्त नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.