पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के
भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरुच...
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. दापचरी, बोर्डी, कासा, उधवा, तलासरी, धुंदलवाडी, डहाणू इत्यादी भागात भूकंपाचे धक्के जाणवले. कालपासून आज पहाटेपर्यंत सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे 15 धक्के बसल्याची गुजरात सिस्मोलोस्टिक रिसर्च सेंटर मध्ये नोंद झाली आहे. यामध्ये रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी 3.4 रिश्टर स्केलवर तर पहाटे 5 वाजून 22 मिनिटांनी 3.7 रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पालघरमध्ये अशाच प्रकारे भूकंपाचे धक्के जाणवत आहे. भूकंपाच्या या धक्क्यांमुळं अनेक घरांना तडे गेले आहेत. अधून-मधून अशा प्रकारे भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये ही भीतीचं वातावरण आहे.
पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरुच आहे. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा परिसर भूकंप प्रवण क्षेत्र-3 मध्ये येत असल्याने येथे अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. भूकंपाचे सत्र कायम असल्यामुळे लोकं ही धास्तावले आहेत.
भूकंपाचे धक्के येथे सतत जाणवत असल्यामुळे अनेकांनी रात्री घरात झोपणं बंद केलं आहे. अनेक जण भूकंपाच्या धक्क्यामुळे घराच्या बाहेर झोपतात. पण यामुळे सर्पदंश आणि विंचूदंशामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.