Eknath Shinde Changes DP: केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिल्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही महिन्यांपासून निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या सुनावणीनंतर आज निवडणूक आयोगाने निकाल दिला. या निकालानंतर शिंदेंनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील डीपी आणि कव्हर फोटो बदलला आहे. हा बदलेला फोटो आणि डीपी चर्चेचा विषय ठरत आहे. ट्विटरबरोबरच शिंदेंनी फेसबुकवरुनही या निकालासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया देताना शिंदेंनी, "हा सत्याचा विजय आहे," असं म्हटलं. त्यानंतर शिंदेंनी आपल्या सोशल नेटवर्किंगवरील डीस्प्ले पिक्चरही बदलला. भगव्या बॅकग्राउण्डवर शिवसेना असा मजकूर आणि वर धनुष्यबाण हे चिन्ह असा डीपी शिंदेंनी ठेवला आहे. शिंदेंनी त्यांच्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाऊंटवर हा डीपी ठेवला आहे. निकाल लागल्यानंतर तासाभराच्या आत शिंदेंच्या अकाऊंटवरील हा डीपी बदलण्यात आला आहे.


फेसबुकवर शिंदेंनी स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या पायाशी बसलेला जुना फोटो पोस्ट केला आहे. हाच फोटो त्यांनी इतर प्लॅटफॉर्मवरही कव्हर फोटो म्हणून वापरला आहे. या फोटोला सविस्तर कॅफ्शन देत शिंदेंनी आपल्या भावनांचा वाट मोकळी करुन दिली आहे.


नक्की वाचा >> EC Shivsena Verdict: "खरा धनुष्यबाण माझ्याकडे", म्हणत उद्धव ठाकरेंनी दाखला 'तो' खास धनुष्यबाण


"निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारत आहोत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही सगळे मावळे आहोत. त्यांच्या विचारांशी प्रतारणा होत असेल तर ती आम्ही पहात राहू शकत नाही. शिवसेना आता योग्य मार्गावर वाटचाल करेल असे वचन आम्ही सर्व मावळे आज तमाम जनतेला देत आहोत," असं शिंदेंनी या पोस्टमध्ये शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 



"धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळाले आहे. या रूपाने वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आशिर्वाद आम्हाला मिळाला असल्याची आमची भावना असून ती प्रसादरूपाने आम्ही स्वीकारत आहोत," असंही शिंदे म्हणाले आहेत.



"शिवसैनिकांनी आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या लढ्यात सामील व्हावे, त्यांना पूर्वीचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्याचे वचन मी आज देत आहे. पुढच्या काळात बाळासाहेबांच्याच विचारांवर वाटचाल केली जाईल आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठीच शिवसेना कार्यरत राहील. महाराष्ट्रातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा. जय हिंद... जय महाराष्ट्र..."; असं म्हणत शिंदेंनी पोस्टचा शेवट केला आहे. यापूर्वी ठाकरे गटापासून वेगळं झाल्यानंतर शिंदेंनी डीपी बदलला होता.