EC Result on Shivsena: ठाकरेंना डिवचण्यासाठी BJP ने पोस्ट केला पवार-राऊतांचा हसरा फोटो; कॅप्शनने वेधलं लक्ष
EC Shiv Sena Result BJP Post: निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला होता.
BJP Troll Sharad Pawar Sanjay Raut: महाराष्ट्रामध्ये जून 2022 पासून सुरु असलेल्या ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट वादावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने 'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निकालामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या शिंदे गटाचा हा विजय आहे असं सांगितलं. तसेच हा निकाल अपेक्षितच होता असं फडणवीस म्हणाले. या निकालानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील मुख्य ट्विटर हॅण्डलवरुन ठाकरे गटाला टोला लगावण्यात आला आहे.
भाजपाने नेमकं काय पोस्ट केलं आहे?
भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) या ट्विटर हॅण्डलवरुन महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये पवार आणि राऊत मनसोक्तपणे हसताना दिसत आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे हात पकडले असून ते हसताना दिसत आहेत.
चर्चेतली कॅफ्शन काय?
पवार आणि राऊत यांच्या या फोटोला भाजपाने 'काम फत्ते' अशी कॅप्शन दिली आहे. इंग्रजीमधून मजकुरामधून, "यस, आपण करुन दाखवलं" असं या फोटोवर लिहिलेलं आहे. तसेच या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेना असे टॅगही वापरण्यात आले आहेत. या टॅगवरुनच ही पोस्ट आज निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर आधारित असल्याचं स्पष्ट होतं आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालावरुन राऊतांचा हल्लाबोल तर पवारांनी स्पष्टच बोलले
या निकालानंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावरील भारतीय जनतेचा विश्वास आज संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. तसेच हा सत्याचा विजय नसून खोक्यांचा विजय असल्याची टीकाही त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना केली. तसेच शरद पवार यांनीही या निकालावर प्रतिक्रिया देताना अगदी रोकठोकपणे आपलं मत मांडलं. हा निकाल निवडणूक आयोगाचा असून त्यासंदर्भात काहीही करता येणार नाही असं पवार म्हणाले आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह स्वीकारा आणि लढा, लोक स्वीकारतील असंही सांगितलं आहे. यावेळी पवारांनी काँग्रेसचं उदाहरण देताना काँग्रेचं चिन्ह आधी बैलजोडी असं होतं. मात्र काँग्रेस आणि इंदिरा गांधींमध्ये वाद झाल्यानंतर काँग्रेसने हात हे निवडणूक निशाण स्वीकारलं. लोकांनी त्यांना स्वीकारलं, असं पवारांनी सांगितलं. निवडणूक चिन्ह बदलल्याने फारसा फरक पडत नाही असं सांगतानाच पवारांनी 15 दिवस एक महिना चर्चा होईल आणि लोक ठाकरे गटाचं नवं चिन्हं स्वीकारलीत असंही मत मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं.