जळगावच्या प्रसिद्ध ज्वेलर्सवर ईडी आणि आयटीचा छापा, राष्ट्रवादीशी आहे खास कनेक्शन
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलर्स राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध कार्यालयांवर ईडी आणि आयकर विभागाकडून एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ज्वेलर्सचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी खास कनेक्शन आहे.
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : महाराष्टातील प्रसिद्ध राजमल लखीचंद अर्थात आर. एल. समूहाच्या (Rajmal Lakhichand Jwellers) विविध आस्थापनांवर ईडी (ED) आणि आयकर विभागाकडून (IT) एकाचवेळी छापेमारी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ई़डी आणि आयकर विभागाच्या जवळपास 20 अधिकाऱ्यांच्या पथकांकडून ही तपासणी करण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. आज देखील सकाळपासून ही चौकशी सुरू आहे.
शरद पवारांशी कनेक्शन
जळगाव जिल्ह्यातील राजमल लखीचंद ज्वेलर्सचे सर्वेसर्वा ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तब्बल पंधरा वर्ष खजिनदार राहिले आहेत. तसंच ते जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे माजी खासदारही होते. जळगाव जिल्ह्यातील राजमल लखीचंद ज्वेलर्ससह त्यांच्या मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणच्या सहा कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालय (ई डी) आणि आयकर विभागाने गुरुवारी छापेमारी केली. आज देखील मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे.
मुंबई,नागपूर आणि संभाजीनगर इथून ईडी पथकाच्या दहा गाड्या गुरुवारी एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिक मधील एकूण सहा कंपन्यांवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी करत त्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली.
स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्जावरुन सीबीआयने गुन्हा दाखल केला होता त्यानंतर ईडी कडून ही कारवाई करण्यात आली आहे. यात राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पण त्यात काहीही राजकीय हस्तक्षेप नसल्याचे आर एल समूहाचे ईश्वरलाल जैन यांनी सांगितले आहे. तसंच त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात काहीही दम नाही. मात्र काही गोष्टी नीट व्हायला वेळ लागतो अशी प्रतिक्रिया ईश्वरलाल जैन यांनी दिली आहे