दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई  : राज्यातील महाविकास आघाडीतील आमदार आणि नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लागली असतानाच आता राज्याच्या कृषी विभागाचीही ईडीमार्फत चौकशी होण्याची चिन्हं आहेत. राज्यात 2008 ते 2011 या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिचंन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता. ठिबक आणि स्प्रिंकल संचाच्या खरेदीत झालेला हा घोटाळा त्या काळी खूपच गाजला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने ईडीने कृषी खात्यातील दक्षता विभागाकडून काही कागदपत्र मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 
हा घोटाळा झाला तेव्हा राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता होती. त्यामुळे आताच्या महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी ईडी आता चौकशीचे पाऊल उचलणार असल्याची चर्चा आहे. 


या घोटाळ्यात कृषी विभागातील काही अधिकारी आणि काही खाजगी कंपन्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. 2011 साली राज्यात या घोटाळ्याप्रकणी तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही कृषी अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाईही केली होती. मात्र पुढे याप्रकरणी काहीच झालं नाही. आता थेट ईडी याप्रकरणी चौकशी करण्याची शक्यता असल्याने या घोटाळ्यातील अधिकारी आणि खाजगी कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. 


सध्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडीने नोटीसा बजावल्या आहेत, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. त्याचबरोबर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांनाही ईडीने चौकशीसाठी बोललं आहे.