Jayant Patil ED Notice : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ची नोटीस पाठविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांना IL and FS प्रकरणात ही ईडीची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांना सोमवारी ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या सोमवारी जयंत पाटील यांची ई़डीकडून चौकशी होणार आहे. मात्र, आता या नोटीसवर जयंत पाटील काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा आज निकाल येणार आहे. त्याचवेळी ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना धक्का बसला आहे. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 


राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या संपर्कात?


गेल्या आठवड्यात घडलेल्या राजकीय घडामाडी आणि त्यानंतर स्वच्छ प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटील यांना नोटीस आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या संपर्कात आहे अशी चर्चा सुरु होती. त्यात शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नवीन अध्यक्ष येणार आणि नंतर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार अशी चर्चा सुरु होती. यावर जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कार्यकारी अध्यक्षही नियुक्त करु नका अशी भूमिका घेतली होती. त्यामळे जयंत पाटील यांनी होऊ घातलेल्या घटनांना मोडता घातला का आणि त्यातून त्यांच्यावर हा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का अशा स्वरुपाची चर्चा सुरु आहे.



ILFS च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी या प्रकरणात राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी बजावत चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. ILFS प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते.



कोण आहेत जयंत पाटील?


जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते 1990 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जयंत पाटील यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे.


काय आहे IL & FS घोटाळा?


- इन्फ्रास्ट्रक्चर लिसिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस
- एक लाख कोटी रुपयांच्या गैरव्यवहार
- IL and FS समूहातील 350 कंपन्यांद्वारे गैरव्यवहार
- IL and FS  घोटाळ्याचा मास्टरमाईंड रवि पार्थसारथीला EOWकडून अटक
- IL and FS समूहावर 90 हजार कोटींचं कर्ज
- घोटाळ्याचा बॅंका, एनबीएफसी क्षेत्र, म्युच्युअल फंडला फटका
- IL and FS च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही IL and FS प्रकरणी चौकशी
-  'कोहिनूर स्क्वेअर' उभारण्यासाठी IL and FSची 850 कोटींची गुंतवणूक