अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीमध्ये (Amravti) एक अत्यंत भयानक वाहन अपघात घडला आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला होता.  इतका भयंकर असा हा अपघात (Terrible Accident) होता. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावतीजवळ महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर मध्यप्रदेशच्या देडतलई येथे हा भीषण अपघात झाला आहे.  ट्रक आणि चार चाकी वाहनाची जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू आहे तर, 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. धारणी भोकरबर्डी पुढे देडतलई शेखपुरा रोडवर हा अपघात झाला. ऊसाने भरलेल्या ट्रकमधून मजूर प्रवास करत होते. 


यावेळी ऊसाने भरलेल्या ट्रकला समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. दोन्ही वाहनांची समोरा समोर धडक झाली आहे. ही धडक इतकी भीषण होती. या अपघातात ट्रक मधील आठ मजूर जागीच ठार झाले. तर आणखी दहा मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या ट्रकमध्ये नेमके किती मजूर होते हे अद्याप समजू शकलेले नाही. 


सर्व जखमींना मध्य प्रदेशातील खंडवा बुरहानपुर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  सर्व मजूर हे ऊस कापणी करून बुऱ्हानपूर येथे जात होते. त्यावेळी हा अपघात घडला.  सर्व मृतक आणि जखमी हे मध्य प्रदेश मधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघात इतका भीषण होता की मृतदेहाचा खच रस्त्यावर पडलेला होता. तर, हा अपघात कोणाच्या चुकीमुळे झाला त्याचा तपास मध्य प्रदेश पोलीस करीत आहेत.